विजेच्या बचतीसाठी आता रुफटॉप सोलर योजना

रत्नागिरी:- भारत सरकारच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये रुफटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत ग्राहकांनी रुफटॉप सोलर आपल्या छतावर बसविल्यास ग्राहकांच्या वीजबिलात बचत होईल आणि या माध्यमातून  ग्राहकांना उत्पन्न देखील मिळेल. याकरिता ग्राहकांनी जास्तीजास्त प्रमाणात रुफटॉप सोलर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.

सिंघल म्हणाले की, केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या या योजनेत घरगुती ग्राहक आणि गृहनिर्माण संस्थाना रुफटॉप बसविण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांना 1 ते 3 कि.वॅ. क्षमतेपर्यंत प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात 40 टक्के तसेच 3 कि.वॅ.चे वर ते 10 कि. वॅ. पर्यंत खर्चाच्या प्रमाणात 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे. याशिवाय गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना करिता 1 कि.वॅ. ते 500 कि. वॅट करिता प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एकूण प्रकल्प खर्चापैकी अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम ग्राहकांनी निवडलेल्या संबंधित एजन्सीला द्यायची आहे.
रुफटॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. एजन्सीने जास्तीजास्त ग्राहकांकडे रुफटॉप सोलर बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. अनुदान प्रक्रियेत कागदपत्रांच्या त्रुटींसंदर्भात कर्मचारी व एजन्सी प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करून अनुदान प्रक्रिया अधिक गतिमान करावी. याकरिता एजन्सीना क्षेत्रीय स्तरावरावर येणार्‍या अडचणींचे निवारण करण्यासाठी नोडल अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देश सिंघल यांनी दिले.