रत्नागिरी:- जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनला कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या विकेंड लॉकडाऊनमुळे सायंकाळपासूनच बाजारपेठांमध्ये सामसूमाट पसरला होता. मोठ्याप्रमाणात पोलीस रस्त्यावर उतरल्याने 2020 मधील लॉकडाऊनचे चित्र पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने रत्नागिरीकरांना पहायला मिळाले.
राज्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दुसरी लाट भयानक असण्याची भिती व्यक्त केलेली असतानाच वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेचा विषय ठरली आहे. कोरोनाची चेन तोडण्याकरीता शासनाने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. पुन्हा नव्याने निर्बंध लागू करून विकेंड लॉकडाऊनची घोषणा शासनाने केली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या कालावधीत विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
यापूर्वी देखील लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीकरांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केले होते. नव्याने जाहिर केलेल्या विकेंड लॉकडाऊनलादेखील रत्नागिरीकरांनी कडकडीत प्रतिसाद दिला. सर्वच बाजारपेठांमध्ये सन्नाटा पसरला होता. केवळ पोलीस रस्त्यावर बंदोबस्ताकरीता तैनात होते.