रत्नागिरी:- तालुक्यातील सर्व विकास संस्थांनी सभासदांच्या सर्वांगिण विकासाबाबत काम करणे गरजेचे आहे. सर्व विकास संस्थांनी नव्या उमेदीने सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहीजेत. याकरीता जिल्हा बँक, सहकार खाते, नाबार्ड या यंत्रणा संस्थांना सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहेत. याकरीता संस्थांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे, जिल्हा उपनिबधंक डॉ. सोपान शिंदे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्था सक्षमिकरणासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेची प्रस्तावना सहाय्यक निबंधक सुधीर कांबळे तर स्वागत उपस्थित मान्यवरांचे स्वागत सहाय्यक सरव्यवस्थापक संदिप तांबेकर यांनी केले. यावेळी रत्नागिरी तालुक्यातील २७ विकास संस्थांचे ६१ प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेचे संचालक गजानन पाटील म्हणाले, संस्थानी स्वतःहून पुढे येऊन काम करण्याची मानसिकता तयार केली पाहीजे. काजू, आंबा प्रक्रिया उद्योगांना कशा पध्दतीने चालना द्यायची यावर संस्थांच्या प्रतिनिधींनी काम करावे. याबाबतच्या माहितीचे दालन बाजार समितीत उपलब्ध करुन दिले जाईल. तर पणनचे सरव्यवस्थापक मिलींद जोशी म्हणाले, गावागावामध्ये आंबा, काजू खरेदीसाठीची यंत्रणा विकास संस्थांनी उभारावी आणि खरेदी केलेला माल कंपन्या किंवा व्यापार्यांना विक्री केला पाहीजे. यामधून ग्रामीण भागातील सामान्य बागायतदारांना निश्चितच चांगला दर मिळेल.
या कार्यशाळेत सहाय्यक निबंधक एस. एस. यशवंत यांनी दुग्ध व्यावसायावर मार्गदर्शन केेले. नाबार्ड योजनांविषयक माहिती जिल्हा विकास अधिकारी मंगेश कुलकर्णी यांनी दिली. जिल्हा बँकेचे धोरण यावर सरव्यवस्थापक सुधीर गिम्हवणेकर आणि संचालक रामभाऊ गराटे, अॅड. दिपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन करताना बँकेच्या योजनांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार नरेंद्र जाधव यांनी मानले.