लवकरच पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार
खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेला मृत्यू हा तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी तातडीने बैठक घेतली. युवकाच्या मृत्यूप्रकरणाचा येत्या चार-पाच दिवसातच अहवाल देण्याची हमी डॉ. आठल्ये यांनी यावेळी ग्रामस्थांना दिल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला.
सोहम शिर्के यांला विंचूदंश झाल्यानंतर उपचारासाठी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी वैद्यकीय अधिकारीच अनुपस्थितीत होते. यामुळे युवकास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी भरणे येथील एका रुग्णालयात करण्याचा युवकाच्या कुटुंबियांना देण्यात आला. या साऱ्या प्रक्रियेत बराच कालावधीही गेला. अखेर उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांसह हलगर्जीपणा करणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांवरही पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदवण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे. लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. डॉ. आठल्ये यांच्या अहवालाकडेच आता ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.