युवकाच्या विंचूदंशाने मृत्यूप्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

१७ वर्षीय युवक मृत्यू प्रकरण, ४-५ दिवसात अहवाल देण्याची दिली होती हमी

खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेल्या मृत्यू प्रकरणाचा ४-५ दिवसात अहवाल देण्याची हमी ग्रामस्थांना दिली होती. मात्र अजूनही ग्रामस्थ अहवालाच्या प्रतीक्षेतच आहेत.

सोहम शिर्के याला विंचूदंश झाल्यानंतर तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उपचार मिळण्यास झालेल्या विलंबामुळे युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आक्रमक ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाला धाब्यावर धरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच युवकाचा हकनाक बळी गेल्याचा आरोप केला होता.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी युवकाच्या मृत्यू प्रकरणाचा ४-५ दिवसातच अहवाल देण्याबाबत संकेत दिले होते. मात्र, अजूनही तसा अहवाल प्राप्त झाला नसल्याची बाब समोर आली आहे. हा अहवाल मिळणार तरी कधी, असा प्रश्न पंचायत समितीचे सभापती पवार माजी सुप्रिया यांनी उपस्थित केला आहे.

२४ तास सेवेबाबतचा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल युवकाच्या मृत्यूनंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णांना २४ तास सेवा देत असल्याचा अहवाल पाठेवल्याची माहिती समोर आली आहे.