रत्नागिरी:- कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गतवर्षी मोठ्याप्रमाणात महसूल कमी झाला होता. मात्र यावेळी कोरोनाची घटती संख्या लक्षात घेऊन निर्बंध शिथिल केल्यामुळे वाहन खरेदी-विक्रीला वेग आला असून रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 11 कोटी 67 लाखाहून अधिक महसूल गोळा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. गेल्या चार महिन्यात 3 हजार 363 नवीन गाड्यांची नोंद कार्यालयात झाली आहे.
गतवर्षी 22 मार्चनंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. जवळपास पाच ते सहा महिन्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे शासनाच्या विविध खात्यांना महसूलामध्ये याचा फटका बसला. गाड्यांची खरेदी-विक्री थांबल्याने महसूल कमी झाला. या कालावधीत अनेक वाहनचालकांना ऑनलाईन कर आकारणी करण्यात आली होती. वाहन मालकांनीही याला चांगला प्रतिसाद गतवर्षी दिला होता.
या वर्षभरात शासनाने हळूहळू निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे गाड्या खरेदी-विक्रीला पुन्हा वेग आला आहे. त्याचप्रमाणे 17 ऑगस्टनंतर कार्यालयातील सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहन परवान्यांच्या रखडलेल्या अर्जांची वाट मोकळी झाली आहे.
जिल्ह्यात वाहनांच्या आयएमव्ही शुल्कापोटी 28 लाख 67 हजार 450रुपयांचा महसूल 31 जुलै अखेरीस गोळा झाला आहे. तर ऑनलाईन पध्दतीने 99 लाख 27 हजार 597 रुपयांचा आयएमव्ही शुल्क जमा झाले आहे. एकूण 1 कोटी 73 लाख 29 हजार 889 रु. शुल्क कार्यालयाकडे जमा झाले. विविध करांच्या रुपाने 11 कोटी 67 लाख 49 हजार 595 रुपये महसूल जमा झाले आहेत. त्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पर्यावरण करापोटी 12 लाख 32 हजार 224 रुपये गोळा झाले आहेत.
कोरोनामुळे रखडलेली गाड्यांची खरेदीविक्रीही वेगाने सुरु झाली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात 2033 गाड्यांची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली. तर जुलैमध्ये 1330 गाड्या अशा 3,363 गाड्यांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात लॉकडाऊन निर्बंध उठल्यावर 333 कारची खरेदीविक्री झाली आहे. 828 दुचाकी खरेदी करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये अॅटो रिक्षा चालकांना मोठा फटका बसला. परंतु जुलैमध्ये 74 रिक्षा खरेदी करण्यात आल्या. चार महिन्यात 179 रिक्षा खरेदी करण्यात आल्या. कोरोना कालावधीत रुग्णवाहिकांना मागणी वाढत आहे. त्यामुळे चार महिन्यात 47 नव्या रुग्णवाहिका जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यात शासकीय रुग्णवाहिकांचाही समावेश आहे.