रत्नागिरी:- मुंबई-वाशीच्या घाऊक फळ बाजारात सध्या कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजारात हापूसचा सुगंध दरवळत आहे.
दक्षिण भारतातून वेगवेगळ्या जातीचे आंबेदेखील बाजारात येऊ लागले असून महागड्या हापूसला पर्याय विविध जातींच्या दक्षिणेकडील आंब्यांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे येथील व्यापारी साई मजगावकर यांनी सांगितले.
घाऊक बाजारात दररोज 60 हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक होत आहे. त्यात 45 हजार पेट्या कोकणातील हापूस आंब्याच्या आहेत, तर 15 हजार पेट्या दक्षिणेकडील आंब्याच्या आहेत. शिवाय, खुल्या स्वरूपातही हा दाक्षिणात्य आंबा मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
या आंब्याच्या 30 ते 40 गाड्या सध्या बाजारात दररोज दाखल होत आहेत. शिवाय या आंब्यांचे दर कोकणातील हापूसच्या तुलनेत कमी असल्याने सर्वसामान्य वर्गाकडून या आंब्याला मागणी असते.
दक्षिणेतील हापूसपाठोपाठ बदामी आंब्यालाही विशेष मागणी आहे. जास्त करून फळांचा रस करण्यासाठी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्यांकडून या आंब्याला विशेष मागणी असते. हापूसचे दर सर्वांनाच परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची दक्षिणेच्या बदामी आंब्याला विशेष पसंती आहे.