वादळी वातावरणामुळे मासेमारीवर परिणाम, बाजारात मासळीचा दुष्काळ

रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार नौकांच्या मासेमारीचे पहिले काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने अनेक नौका समुद्रात मासेमारीसाठी जावू शकलेल्या नाहीत. ज्या नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या त्यांना पुरेशी मासळी न मिळाल्याने मासळीचे दर कडाडलेलेच होते. श्रावणातील उपवास संपल्यानंतरच्या रविवारी दर वधारलेले असल्याने मासळी मार्केटमध्ये शुकशुकाट होता.

पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर फिशिंगच्या नौका समुद्रात जाऊ लागल्या. पुढील काही दिवसांतच हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नौका बंदरातच उभ्या होत्या. धोक्याचा इशारा संपल्यानंतर मासेमारी नौका समुद्रात जाऊ लागल्या तेव्हा समुद्रातील उंच लाटा पिळवटणाऱ्या असल्याचे दिसून आले. या पिळवटणाऱ्या लाटा समुद्रात टाकलेल्या जाळ्यांना पिळवटून टाकतात. त्यामुळे जाळ्यात मासळी मिळण्याऐवजी त्या जाळ्यांनाच पीळ बसून फाटली जातात. अशी जाळी दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. पर्यायाने फिशींगची मासेमारी सध्या फारच कमी झाली आहे.

समुद्रातील मासे खाणाऱ्या केंड माशाव्यतिरिक्त इतर चविष्ठ मासळी फारच कमी प्रमाणात मिळाली. हा केंड मासा फिशमिल कंपन्यांना विकला जातो. लेप जातीचा मासा मात्र बऱ्यापैकी मिळत होता, असे मच्छीमारांनी सांगितले. खवय्यांना आवडणारी मासळी मिळालीच नसल्याने मार्केटमध्ये आलेल्या माशांचे दर चढे होते. यामध्ये पापलेटचा किलोचा दर १ हजार रुपये इतका होता. लहान सुरमई ६०० रुपये किलो दराने मिळत होत्या. बांगडा १३० ते १५० रुपये तर सौंदाळा आकारानुसार ३०० ते ३५० रुपये दराने विकला जात होता. लहान कोळंबीचा १ किलोचा दर २५० रुपये तर मोठ्या कोळंबीचा दर ४०० रुपये इतका होता. त्यामुळे खवय्यांची मासळी मार्केटमध्ये फारच कमी गर्दी होती.

सरंगा झाला होता गायब !

सरंगा किंवा हलवा खवय्यांच्या आवडीचा मासा रत्नागिरीतील मासळी मार्केटमधून गायब होता. हाच मासा पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मिळाला असल्याने दरही कमी होते, असे मच्छी व्यावसायिक महिलांनी सांगितले.