रत्नागिरी:-तोक्ते वादळाचा धुमाकूळ संपूर्ण रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्हाची वेस ओलांडल्या नंतर देखील वादळी वाऱ्याने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे.
तोक्ते चक्रीवादळाने मिरकरवाडा परिसराला दणका दिला आहे. रात्रभर सुटलेल्या वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकाना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नौका एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. रात्रभर हा प्रकार सुरू होता. भीतीपोटी मच्छीमारांनी रात्रभर जागून काढली.
मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मच्छीमारांच्या मदतीसाठी रात्र जागून काढली.