वादळाने जिल्ह्यात 62 नौकांचे 65 लाखाचे नुकसान

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याला मोठा दणका दिला. घर, गोठयांसह जिल्ह्यात मासेमारी नौकांना देखील या वादळाचा फटका बसला. पूर्वसूचनेमुळे नौका आधीच बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या असल्या तरी वादळी वाऱ्यांमुळे नौका एकमेकांवर आढळून मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे मत्स्य विभागाने केले असून जिल्ह्यात 62 नौकांचे नुकसान झाले आहे. 

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा किनारपट्टी भागाला सर्वाधिक बसला. वादळाची आधीच कल्पना दिल्यामुळे मच्छीमारी नौका सुरक्षितरित्या बंदरांमध्ये उभ्या केल्या होत्या; परंतु वेगवान वार्‍यामुळे बंदरात उभ्या केलेल्या नौका एकमेकांवर आदळून नुकसान झाले आहे. त्याचे पंचनाम मत्स्य विभागाकडून केले जात आहेत. जयगड बंदरात उभ्या असलेल्या दोन नौका बुडून नुकसान झाले. उर्वरित 62 नौकांचे एकमेकांवर घासून नुकसान झाले आहे. एकुण नुकसानीचा आकडा 65 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक मिरकरवाडा बंदरातील 28 नौकांचा समावेश आहे. राजापूरातील 7 असून उर्वरित नौका अन्य बंदरातील आहेत. यावेळी नौका बंदरात सुरक्षित ठेवल्यामुळे जाळी वाहून नुकसान झाल्याचे प्रकार घडलेले नाहीत.