वादळाचा जोर ओसरला तरीही मासळी खोल समुद्रातच; मच्छीमार हवालदिल

रत्नागिरी:- वादळाचा जोर पूर्णतः ओसरला आहे; मात्र अजुनही मासळी खोल समुद्रातच असल्यामुळे रापणीवाल्यांसह दहा वावाच्या आत मासेमारी करणार्‍या छोट्या नौकांना मासळीची प्रतिक्षाच आहे. 10 ते 15 वावामध्ये बांगडी माशाचा रिपोर्ट लागत आहे. एका जाळ्याला 1800 ते 2000 रुपये दर मिळत असल्याने त्यांच्यासाठी एकप्रकारे दिलासाच आहे.

बंगालच्या उपसागरात पंधरावड्यात सलग दोनवेळा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरण बिघडले होते. समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारी बंद झाली होती. गेल्या आठ दिवसात हळूहळू वातावरण स्थिर होत आहे; परंतु मासळी मिळत नसल्याने गिलनेटसह छोट्या मच्छीमारांनी बंदरात उभे राहणे पसंत केले आहे. कासारवेली, मिर्‍यासह जयगड, नाटे येथील किनार्‍यापासून काही अंतरावर मासेमारी करणार्‍यांनी समुद्रात धाव घेतली होती. त्यांच्या हाती काहीच न लागल्यामुळे ते माघारी परतले. एका फेरीला 100 लिटर डिझेल लागते. त्याचा खर्च 800 ते 1000 रुपये येतो. तो मच्छीमारांच्या अंगावर पडला आहे. वादळ सरल्यानंतर मासळी किनार्‍याकडे येईल ही आशा फोल ठरली आहे. ही परिस्थिती लवकर दूर होईल अशी आशा बाळगून मच्छीमार जेटीवर जाऊन माघारी परतत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती रापणीने मासे पकडणार्‍यांची झाली आहे. वादळ सुरु असताना रत्नागिरीतील काही रापणवाल्यांना लाखाची मासळी दर दोन ते तीन दिवसांनी लागत होती. ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती होती. पण शेवटच्या आठवड्यात पुन्हा त्यांच्या पदरी निराशा आली आहे. गेले आठ दिवस दिवस रापाणीवाल्यांनी मासेमारी करणेच सोडून दिले आहे.

छोट्या मच्छीमारांची अवस्था वाईट असतानाच पर्ससिननेटसह ट्रॉलिंगला बर्‍यापैकी मासे लागत आहेत. 10 ते 15 वावात मासेमारी करणार्‍या 25 ते 30 हजाराचा रिपोर्ट गेले आठ दिवस लागत आहे. शंभर मच्छीमारांपैकी पन्नास टक्के लोकांना मासा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. यामध्ये सर्वाधिक बांगडी आणि उष्टी बांगडी मिळत आहे. एका जाळीचा (32 किलो) दर 2000 रुपये मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी परराज्यातील नौकांनी रत्नागिरी, गुहागर किनार्‍यावर हजारो टन मासळी पकडून नेल्यामुळे स्थानिकांच्या उत्पादनावर घाला पडला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर भविष्यात मासे मिळत राहतील, अन्यथा जिल्ह्यातील उत्पादन कायम घटतच राहणार असल्याचे मच्छीमार सांगत आहेत.