रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील तरुणांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. मागील काही वर्षे येथे तरुण गौरी विसर्जना दिवशीच नदी किनारी जमा होणारे निर्माल्य जमा करून त्याची विल्हेवाट लावत आहेत. मंगळवारी देखील या तरुणांनी निर्माल्य गोळा करत त्याची विल्हेवाट लावली.
मंगळवारी जिल्हाभरात गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील वाटद येथे देखील मोठ्या संख्येने गौरी गणपती विसर्जन झाले. वाटद येथील चौदा वाड्यांमधील सर्व २५० ते ३०० घरगुती गणपती विसर्जन वाटद येथील नदीमध्ये करण्याची प्रथा आहे. दरवर्षी सामूहिक पद्धतीने मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीमूळे सोशल डिस्टन्स पाळून विसर्जन करण्यात आले.
चौदा वाड्यांमधील गणेश विसर्जन वाटद येथील नदीमध्ये होत असल्याने विसर्जनानंतर नदी किनारी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी येथील स्थानिक तरुणांनी मागील काही वर्षांपासून हे निर्माल्य गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कामगिरी हाती घेतली आहे.
मंगळवारी गौरी विसर्जनानंतर देखील हीच कामगिरी या तरुणांनी केली. यात वाटद मधील सामाजिक कार्यकर्ते उमेश रहाटे यांच्यासह दीपक कोळवणकर, तुषार रहाटे,अमित सूर्वे, प्रसाद रहाटे, प्रथमेश रहाटे, यांचा सहभाग होता. प्रत्येक गाव गावात तरुणाने निर्माल्य गोळा करावे त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे असे या तरुणांचे मत आहे. *उत्साह उत्सवाचा ध्यास पर्यावरणाचा* हे ब्रीद वाक्य घेऊन ही तरुण मंडळी वाटद परिसरात समाजकार्य करत आहेत.