वाटद येथे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:– मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अर्जून सोनलाल (वय ३०, रा. गाव रानीगंज, पोस्ट सुल्तानपूर, थाना पिपरा. उत्तर प्रदेश. सध्या रा. वाटद-खंडाळा रत्नागिरी ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी पावणे अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जून सोनलाल याने मद्याच्या नशेत आंबा बागेतील औषधे ठेवलेल्या रुम मधून आंबा फवारणीचे औषध प्राशन केले. तात्काळ त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.