वाटद खंडाळा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जयगड:- जयगडजवळील वाटद खंडाळा येथे २१ वर्षीय तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जुलै रोजी सायंकाळी घडली. हीरसिंग मसरसिंग रजपूत (मूळ रा. खारा, ता. संचोर, जि. जालोर, राजस्थान, सध्या रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरसिंग हा वाटद खंडाळा येथे अंकुश तांबे यांच्या घरी भाड्याने राहत होता. मंगळवारी, ८ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास त्याचा मामा त्याच्या खोलीवर गेला. बराच वेळ दार वाजवूनही हीरसिंगने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याच्या मामाने दरवाजा जोरात उघडून आत प्रवेश केला असता, हीरसिंग बेडरूममधील सीलिंग फॅनला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला.

तात्काळ त्याला खाली उतरवून उपचारासाठी वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. ८ जुलै २०२५ रोजी रात्री ११.०९ वाजता भारतीय न्याय संहिता च्या कलम १९४ नुसार, आमू. क्रमांक २०/२०२५ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हीरसिंगच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जयगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.