रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-कोलतेस्टॉप येथे ट्रकने एसटी बसला मागून ठोकर दिली. या अपघातात एसटीतील चार प्रवासी जखमी झाले. जयगड पोलिस ठाण्यात संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिबलाल रितलाल महतो (रा. अंबाडिह कल्हबर तेलखरा गिरीडीह राज्य झारखंड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) सव्वा बाराच्या सुमारास कोलते स्टॉप वळणावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरदेव तुशीराम कोळेकर (४५, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर सध्या पराडकर चाळ, माळनाका, रत्नागिरी) हे एसटी बस (क्र. एमएच-२० डी १४००) घेऊन खंडाळाहून रत्नागिरीकडे येत असताना कोलते स्टॉपच्या मागील वळणावर आले वेळी समोर ट्रक (क्र. एमएच-०९ ईएल ६३९०) हा रस्त्याचे डावे बाजूस उतरलेला असल्याने एसटी चालक कोळेकर यांनी एसटी जागीच थांबवली. त्यावेळी खंडाळाहून येणार ट्रक (क्र. एमएच-०९ एफएल ३६४९) वरिल संशयित चालक महतो निष्काळजीपणे ट्रक चालवून एसटीला मागून ठोकर दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले तर प्रवासी शशिकांत पांडूरंग सावंत (५५, रा. कोळीसरे-बौद्धवाडी, रत्नागिरी) जोस्ना बलवंत पोमेंडकर (४४, रा. जांभारी पावरी वठार रत्नागिरी), सुभाष सुलाजी कुरटे (५५, रा. वाटद वाघलोंडी, रत्नागिरी), प्रज्ञेश संजिवन पोमेंडकर (२६, रा. जांभारी पावरीवठार, रत्नागिरी) हे जखमी झाले. या प्रकरणी एसटी चालक नगरदेव कोळेकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









