वाटद एमआयडीसी रद्दसाठी ना. उदय सामंत यांच्या शब्दावर सहा गावे ठाम

ना. सामंत आणि शिवसेनेच्या माध्यमातून लढा देण्याचा निर्धार 

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद येथे प्रस्तावित एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांनी एकीची वज्रमुठ पुन्हा आवळली आहे. एमआयडीसी रद्द करण्याच्या ना. उदय सामंत यांच्या शब्दाच्या बाजूने ठाम उभे राहण्याचा निर्धार वाटद येथील सहा गावांनी केला. या बाबतची बैठक शनिवारी सर्व शासकीय नियम पाळून घेण्यात आली. या बैठकीत एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून ना. सामंत आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली पुढील लढा देण्याचे निश्चित करण्यात आले.   

जयगड पंचक्रोशीतील वाटद येथे एमआयडीसी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या एमआयडीसीला ग्रामस्थांनी पहिल्या दिवसा पासून विरोध दर्शवला आहे. प्रस्तावित एमआयडीसीने येथील जैवविविधता धोक्यात येणार आहे. कळझोंडी हे गाव मोर व लांडोर आणि बिबटे यांच्या अधिवासाचे मुख्य केंद्र आहे. तर वाटद हे जैवविविधतेने नटलेले गाव असून कांदळवन खूप असून नदी किनारी पावसाळ्यात समुद्राच्या खाऱ्यापाण्यात माशांची पैदास खूप होते.कोळीसरे हे गाव पर्यटन स्थळ आहे. हा वारसा शासनाने जपावा अशी मागणी होत आहे. यासाठी  या एमआयडीसी विरोधात संघर्ष समिती तयार करण्यात आली. या संघर्ष समितीच्या माध्यमातून मुंबई चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ यांची मोट बांधून एकत्रित लढा सुरू आहे. 
 

एमआयडीसी रद्दसाठी स्वतः ना. उदय सामंत यांनी वाटद येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ना. सामंत यांनी आपण स्थानिक भूमीपुत्रांसोबत असल्याचे जाहीर केले. 
 

या पार्श्वभूमीवर वाटद एमआयडीसी विरोधाला धार चडली आहे. शनिवारी सर्व सोशल डिस्टन्सचे नियम पाळून वाटद, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ, वैद्यलावगण आणि मिरवणे या सहा गावांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबईकर चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व शिवसेनेच्या माध्यमातून वाटद एमआयडीसीला ठाम विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला. याला सर्व ग्रामस्थ, शेतकरी व प्रकल्प बाधित यांनी एकमुखाने संमती दर्शवली असून ना. सामंत आणि शिवसेना यांना आवश्यक सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. 

वाटद पचक्रोशीचा वारसा जतन करावा

वाटद पंचक्रोशीला जैवविविधता आणि पर्यटन स्थळांचा वारसा आहे. शासनाने हा वारसा जपावा. पचक्रोशीच्या गावातील पर्यटन स्थळाचे जतन करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून  होत आहे.