रत्नागिरी:- जिल्ह्यात मंगळवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 66 हजारहून अधिक गणरायांची स्थापना झाली. पावसाच्या साथीने सकाळी अनेकांनी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.
जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ग्रामीण भागासह शहरी भागात उत्साहाला उधाण आले असून मोठ्यासंख्येने चाकरमानी गावागावात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी घरोघरी गणरायांचे आगमन झाले. त्यामुळे मृदुंगाच्या तालावर आरत्यांचा आवाज आता जिल्ह्यात घुमू लागला आहे. जिल्हयामध्ये 1 लाख 66 हजार 986 घरगुती गणपती पैकी 11 हजार 984 दीड दिवसांचे गणपती आहेत.
जिल्हयामध्ये आज १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती गणपती तर ११६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी दाखल झाले आहेत.
प्रत्येक गावामध्ये कुठे घुंगरांचा आवाज तर कुठे तबल्याची साद ऐकू येते. अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचा आवाज ऐकू येतो. आजपासून सार्वजनिक आरत्याही आवाज घुमणार आहे.