वाजत-गाजत अगदी चारचाकी गाडीतून विद्यार्थ्यांचे शाळेत जंगी स्वागत 

रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षांनी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने बुधवारी शाळा गजबजून गेल्या. पहिल्याच दिवशी शिक्षकांसह संस्था चालकांनी औक्षण करत पुष्पवृष्टी करत ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्याचे शाळेत स्वागत केले. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागताने विद्यार्थीही भारावून गेले.

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तब्बल १२ हजार २०६ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला.शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेतील वातावरणही आनंदमयी करण्यात आले होते. मुलांच्या स्वागतासाठी शाळांच्या दरवाजाची आकर्षक फुले, फुगे, यांनी सजविलेल्या कमानींची सजावट करून त्यांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. त्यापूर्वी शहरासह, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी त्यांची वाजत‚गाजत मिरवणूकही काढण्यात आल्या. शहरातील शाळांमध्ये त्यांच्या मुख्य  प्रवेशद्वारावर विद्यार्थी येताच स्वागत केले जात होते. पण ग्रामीण भागात हे चित्र काहीसे वेगळे होते. तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ढोल‚ताशांच्या गजरात मिवरणूकाही काढल्या. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी चारचाकी गाड्या सजवून त्यातून विद्यार्थी आणण्यात आले. त्या मिरवणूकीत शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, लोकपतिनिधींही सहभागी झाले होते.पहिल्या दिवशी नवे दप्तर, नवा शालेय पोषाख, नवी पुस्तके, साहित्य, अशा वातावरणात विद्यार्थ्याचा अनोखा साज होता. त्यावेळी अनेक मुलांचे पालकही सोबत शाळांमध्ये आलेले होते. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही शाळांमध्ये यादिवशी गर्दी झालेली होती. अशा या शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात इ. १ ली ते ८ वीत शिकणाऱ्या ६ लाख १३ हजार ०६६ पाठपुस्तक संचाचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या हातात पाठयपुस्तके देण्यात आली. शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५१ हजार ९६३ विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समितीमधील सर्व खात्याचे अधिकारी, समगÏ शिक्षाकडील सर्व कर्मचारी, पर्यवेक्षीय अधिकारी यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी भेटीसाठी जिल्हाभरातील ठिकठिकाणच्या शाळांमधुन उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मुलांचे स्वागत करण्यात आले.