संगमेश्वर:- दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे २५ ऑक्टोबर रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मकरंद कृष्णा पाल्ये (वय ३२ वर्षे, रा. वांद्री कुणबीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मकरंद पाल्ये याला दारू पिण्याचे व्यसन होते, तसेच त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असल्याने तो अपंग होता. या अपंगत्वामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते, या गोष्टीचे त्याला प्रचंड नैराश्य आले होते.
या नैराश्यातूनच मकरंद याने २५ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान वांद्री कुणबीवाडी येथील त्याच्या राहत्या घराच्या खोलीतील पंख्याच्या वर असलेल्या लोखंडी चॅनलला नायलॉनची रस्सी बांधून गळफास घेतला.
या घटनेची खबर मयत तरुणाचे शेजारी राहणारे अवधूत सुभाष सालीम यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेच्या स्थळी जाऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मकरंदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









