चिपळूणः– तालुक्यातील वहाळ ते अबीटगाव मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप बाबाजी घडशी (36, वहाळ-घडशीवाडी) याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. अपघातप्रकरणी त्या दुचाकीस्वारावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अक्षय बाबाजी घडशी (25, वहाळ- घडशीवाडी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 रोजी सकाळी 8.15 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास प्रदीप हा कामासाठी अक्षय घडशी याच्या नावे असलेली दुचाकी घेऊन वहाळ ते अबीटगाव या रस्त्याने जात होता. मात्र अतिवेगामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरून त्यात प्रदिपचा मृत्यू झाला.









