रत्नागिरी:- तालुक्यातील पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफन भूमित बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारण्याच्या प्रक्रियेला स्थानिकांचा विरोध असतानाही शुक्रवारी (ता. 23) मोजणीसाठी गेलेल्या बीएसएनएलच्या अधिकार्यांना माघारी परतावे लागले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम यांनी टॉवरसाठी अन्य जागेचा विचार करावा अशी सुचना केली. तसेच खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत योग्य तोडगा काढण्यात येईल असेही सांगितले.
पाली बोद्धवाडी येथील दफनभूमीची स्वतंत्र जागा शासनाच्या मालकीची आहे. या जागेचा वापर ब्रिटिश काळापासून बौद्धवाडी दफनभूमी म्हणून करत आली आहे. या जागेत टॉवर न उभारता गावात उपलब्ध असलेल्या शासकीय जागेचाविचारा करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांचा विरोध असतानाही महिन्याभरात दुसर्यावेळी मोजणीसाठी अधिकार्यांचे पथक दाखल झाले. तेव्हा ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती परशुराम कदम यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष अधिकार्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, मोजणीला किंवा टॉवरला लोकांचा विरोध नसून या जागेला स्थानिकांचा विरोध आहे. या भागात इतर शासकीय जागा देखील आहे. या दफनभूमीत अनेकांना दफन केले आहे. लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे पुन्हा उकरून त्यावर टॉवर उभारण्यास विरोध आहे. हा विषय दिशा समितीच्या बैठकीत देखील खासदार राऊत यांच्या समोर घेण्यात आला होता. या बैठकीला बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीमार्फत पाच ते सहा जागा दाखवण्यात आल्या होत्या. गावात सुमारे 37 शासकीय भूखंड आहेत. तेथे टॉवर उभारण्यासाठी पुरेशी जागा आणि परिस्थिती आहे. तरीही याच जागेचा विचार केला जात आहे.
दरम्यान, वाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहिल्यानंतर अधिकार्यांनी मोजणी न करताच माघारी परतणे पसंत केले. टॉवर उभारण्यापुर्वी जागेच्या शेजारील लोकांना नोटीस देणे आवश्यक होते; परंतु तशी कोणतीच कायदेशी प्रक्रियाही केलेली नाही. यावर खासदार राऊत नक्कीच न्याय देतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे.