कोरोनाचं सावट कायम; 50 टक्के उपस्थितीची शक्यता
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरांमधील अठवी ते बारावी अशा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शाळांमधील प्रत्यक्ष शिकवणीला सोमवारपासून (ता. 4) सुरुवात होत आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने सव्वा लाखापैकी पन्नास टक्के विद्यार्थी शाळेत दाखल होतील असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
कोरोना बाधितांची संख्या घटत असल्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनाला सुरवात होते आहे. जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिकच्या 500 व प्राथमिकच्या 1 हजार शाळा सुरू होतील असा अंदाज आहे. सोमवारपासून विद्यार्थ्यांची किलबिलाट होणार आहे. वर्षभरानंतर विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत. शाळा सुरू करताना विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने स्थानिक शैक्षणिक समितीकडे सोपवली आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे लसीकरण बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोना तपासणी, चाचणी आणि लसीकरणासाठी जिल्ह्यातील काही शाळा घेण्यात आल्या आहेत. त्यांना अजुनही प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था दिलेली नाही. त्यामुळे तेथील व्यवस्थापन समिती शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. जिल्ह्यात तिसहून अधिक शाळांचा त्यात समावेश आहे. अन्य शाळा सुरु होतील आणि या शाळांमधील शिक्षण तसेच राहणार आहे.