वर्षभरात ६८३ कासवांची पिल्ले झेपावली समुद्राकडे

रत्नागिरी:- कासव संवर्धनाच्यादृष्टीने वनविभागाने भरीव काम केल्याचे पुढे आले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्ह्यातील किनारी भागात १८० घरट्यांचे संवर्धन केले होते. त्यामध्ये १८ हजार ५०७ कासवांची अंडी होती. घरट्याचे संरक्षण केल्यानंतर ६८३ कासवांची पिल्लं मार्ग काढत काढत समुद्राच्या पाण्यात झेपावली.

कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासव येतात; मात्र यापूर्वी त्याचे संरक्षण होत नव्हते. त्यामुळे अनेकवेळा अंडी घातलेली ही घरटी उद्ध्वस्त होतात. प्राणी ही अंडी खातात किंवा जर अंड्यातून पिल्लं बाहेर पडली तर ती पाण्यात पोहचेपर्यंत किनाऱ्यावरच पक्षी खातात किंवा ती मरतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून कांदळवन कक्ष, वनविभाग आणि कासवमित्र यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात कासवांच्या घरट्यांचे संरक्षण आणि संवर्धन होत आहे. ज्या किनाऱ्यावर घरटी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी कांदळवन कक्षाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॅचरीसाठीही निधीही दिला जातो.

जिल्ह्यातील मालगुंड, गावखडी (ता. रत्नागिरी), वाडावेत्ये, माडबन (ता. राजापूर) या किनाऱ्यांवर फेब्रुवारी २०२४ ला चार ठिकाणी १८० घरटी मिळाली. कांदळवन कक्ष, वनविभाग आणि कासवमित्रांमार्फत या घरट्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले. यामध्ये १८ हजार ५०७ कासवांची अंडी होती. ४० ते ४५ दिवसांच्या संवर्धनानंतर ६८३ अंड्यांतून कासवाची पिल्लं बाहेर आली. ही पिल्लं मार्ग काढत समुद्राच्या पाण्यात झेपावली. यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कासवांचे संवर्धन होताना दिसत आहे.