वीस टक्के शाळकरी मुले ; सर्वात जुने कासव आकर्षण
रत्नागिरी:- समुद्रात विविध प्रकारचे मासे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून अनेक पर्यटक रत्नागिरीतील प्रसिध्द मस्त्यालयात म्हणजेच सागरी संग्रहालयात येतात. कोरोनानंतर पर्यटकांचा ओढा वाढला. 2022-23 या आर्थिक वर्षात 60 हजार 903 पर्यटकांनी मत्स्यालयाला भेट दिली. यामध्ये 20 टक्के शाळकरी मुलांच्या सहलींचा समावेश आहे.
रत्नागिरी मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशनने 1985 मध्ये सागरी संग्रहालयाची स्थापना केली. हे मत्स्यालय सध्या मिर्या गावाकडे जाणार्या चौकात सुरु आहे. कोरोनामुळे 2019-20 आणि 2020-21 या कालावधीत मत्स्यालय लोकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर 2021 मध्ये हे मत्स्यालय पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर राज्यातील पर्यटकांनी मत्स्यालय पाहण्यासाठी गर्दी केली होती. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात सुट देण्यात आली आहे. मत्स्यालय खुले केल्यानंतर नोव्हेंबर ते 2022 मार्च या कालावधीत 35 हजार पर्यटकांनी भेटी दिल्या. तर 2022-23 या आर्थिक वर्षात 60 हजार 903 पर्यटकांनी मत्स्यालयाला भेट दिली. या ठिकाणी चार छोटे तलाव उभारले असून त्यामध्ये पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. वर्षाला मत्स्यालयातून साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळते. कोरोनानंतर विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात शाळेतील सहली या मत्स्यालयाला भेट देतात. एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे पहायला मिळत असल्याने सिंधुदुर्ग, रायगडमधील अनेक शाळांच्या सहली येथे येतात. शाळांसाठी शुल्कामध्ये पन्नास टक्के सुट ठेवण्यात आली आहे.
एक हजाराहून अधिक जलचर
मत्स्यालयात सागरी घोडा मासे, सिंह मासे, ट्रिगर फिश, समुद्री कासव, ईल, समुद्री काकडी, स्टार फिश, लॉबस्टर, सागरी साप आणि इतर असामान्य आणि उत्कृष्ट नमुने या सागरी संग्रहालयात आढळतात. सागरी माशांबरोबरच गोड्या पाण्यातील मत्स्यालय विभागाचीही स्थापना करण्यात आली आहे. आकर्षक आणि फॅन्सी-रंगाच्या माशांसह या भागात कोळंबी, खेकडे, कासव, बार्ब आणि जलचर यांसारखे स्थानिक पातळीवर उपलब्ध गोड्या पाण्यातील जलचर प्राणी पाहता येतात. ग्रीन टर्टल कासव सर्वात जुने असून पर्यटकांना त्याचे आकर्षण आहे. या केंद्रामध्ये एक हजारहून अधिक जलचर आहेत. या संग्रहालयात अनेक वर्षापुर्वी जतन केलेला आणि जुना व्हेलचा सांगाडा आहे. त्याची लांबी 55 फूट आणि 5000 किलोग्रॅम वजन आहे. मत्स्यालयांला दरवर्षी चांगला प्रतिसाद लाभत आहे.









