वर्षभरात कासवांची 23 हजार 706 पिल्ले झेपावली समुद्राकडे 

गतवर्षीपेक्षा दुप्पट संवर्धन; विशेष मोहिमेचे फलित 

रत्नागिरी:-कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडात यंदा समुद्री कासवांची 23 हजार 706 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. 2020-21 या वर्षात कासवांची 475 घरटी तिन्ही ठिकाणी आढळली. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पिल्ले सोडण्यात आली. 2019-20 च्या तुलनेत जन्म दर 57 टक्के आहे. तो गतवर्षी 35 टक्के होता. रत्नागिरीत हाच दर 42.15 टक्के आहे. कासव संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेतल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

मागील दोन दशकापासून कोकणातील काही किनार्‍यांवर वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींतर्फे समुद्री कासव संवर्धन मोहिम हाती घेतली आहे. रायगडमध्ये 4 तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी 13 किनार्‍यांवर ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या तेथे अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. यंदा तो वातावरणातील बदलांमुळे पुढे गेला. 2020-21 मध्ये कोकण किनारपट्टीवर कासवांची 475 घरटी आढळली. गतवर्षी ती 228 होती. घरट्यांची संख्या दुप्पट झाली. रायगड जिल्ह्यात दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ किनार्‍यावर कासवाची 29 घरटी आढळली. रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, कर्दे, मुरुड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन, वडाव्येत्ये या किनार्‍यांवर एकूण 282 आणि सिंधुदुर्गत 164 घरटी संवर्धित केली. या सर्व घरट्यात एकूण 50 हजार 799 अंडी सापडली. त्यातून 50 हजार 799 पिल्ल जन्मास आल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले. पिल्लांचा जन्म दर यंदा 57 टक्के असून गतवर्षीपेक्षा अधिक आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पेक्षा रायगडमध्ये घरटी आणि अंडी कमी प्रमाणात सापडली. परंतु तिथे पिल्लांचा जन्म दर हा दोन्हीपेक्षा अधिक आहे. रायगडात 3 हजार 211 घरट्यातून 2 हजार 137 अंडी सापडली असून जन्म दर 66.6 टक्के आहे. रत्नागिरीत तोच 42.15 टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये 50.9 टक्के आहे.

कांदळवन कक्षाकडून किनारपट्टीवर कासव संवर्धनासाठी वन विभागाने कासव मित्रांची नेमणूक केली आहे. कासव मित्रांकडून कासवांची अंडी शोधणे, त्यांचा सांभाळ करणे, घरट्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्याची जबाबदारी असते.