रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील तिवरी बंदरावर असलेल्या जेटीलगत येथील माजी सरपंचाने थेट जेसीबीच्या मदतीने अनधिकृत खोदकाम केले आहे. यामुळे जेटीला धोका निर्माण होण्याची भीती इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या मालकीची मासेमारी नौका बाहेर यावी यासाठी हे खोदकाम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे हे खोदकाम करताना कोणत्याही खात्याची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वरवडे तिवरी बंदर येथे अनेक वर्षांपासूनची जेटी आहे. पारंपरिक मच्छीमार आणि अन्य नौका मासेमारीसाठी याच जेटीचा वापर करतात. मात्र, ही जेटी सुरू असलेल्या खोदकामामुळे धोकादायक होण्याच्या मार्गावर आहे. माजी सरपंच यांच्या कडून या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. विशेष म्हणजे स्वतः ची मासेमारी नौका बाहेर यावी यासाठी हे खोदकाम सुरू आहे. जेटीच्या पायथ्याशी असलेले दगड जेसीबीच्या मदतीने बाजूला केले जात आहेत. यामुळे भविष्यात समुद्राचे पाणी किनाऱ्यावर शिरून किनारपट्टीला धोका निर्माण होण्याची भीती आहे. याची तक्रार करताच ग्रामपंचायत तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचयादी घातली आहे.