वरवडे ग्रामपंचायती मार्फत कोविड योद्ध्यांचा सन्मान 

अभिनव उपक्रम; तालुक्यातील पहिली घटना 

रत्नागिरी:- कोरोनाच्या महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता वरवडे गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम वरवडे ग्रामपंचायतीमार्फत सरपंच निखिल बोरकर यांनी राबविला. ग्रामकृतीदलात कार्यरत करणार्‍या सर्वांचा सन्मान केला होता. ग्रामपंचायती मार्फत असा गौरव करण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. 

वरवडे गावातील ग्रामकृतीदलातील पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, तलाठी यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे डॉ. नितिन कळबटे हे कोविड योद्धे म्हणून गेले चार महिने काम करत आहेत. त्यांचा सन्मानपत्र, पीपीई किट आणि भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर कोरोना कालावधीत समन्वयाची भुमिका घेऊन ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेले ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला गेला. या कार्यक्रमाला सरपंच निखिल बोरकर, पोलीस पाटिल विजय जोशी, सौ. नीता जोशी, आशा सेविका गीता गावकणकर, आरोग्य सेविका सौ. माने मॅडम, आरोग्य सेवक श्री. झगडे, डॉ. नितीन कळंबटे,  ग्रामपंचायत लिपिक विकास पारकर, तलाठी श्री. पाठक, वरवडे ग्रामसेवक वी. वी. बुंदे आदी उपस्थित होते. वरवडे गावामध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ नये यासाठी ग्रामकृतीदलाचे नेतृत्त्व करणार्‍या सरपंच निखिल बोरकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामांचे कौतुक म्हणून सर्वांतर्फे सन्मान करण्यात आला. तरुण वयात प्रगल्भतेने केलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांनी कौतुकाची थाप निखिलच्या पाठीवर दिली आहे.

याप्रसंगी श्री. बोरकर म्हणाले, कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला विविध सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्याचे तंतोतंत पालन करतानाच ग्रामकृतीदलाची स्थापना केली गेली. मुंबईकर चाकरमान्यांच्या विलगीकरणापासून ते खासगी कंपनीत जाणार्‍या कामगारांच्या प्रश्‍नापर्यंत विविध अडचणींवर मात करण्यात कोविड योध्दयांचा महत्त्वाचा वाटा आहे. कोरोना रुग्ण आढळू नये यासाठी सर्वच कोविड योध्दयांनी पावले उचलली आहेत. ग्रामस्थांपर्यंत पोचण्याचे काम या लोकांनी केले आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून छोटासा सन्मान ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला आहे.