रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील ग्रामस्थांनी शासकीय मदत मिळत नसल्याने खचून न जाता स्वखर्चाने आणि स्वतः मेहनत घेत गावातील बंधाऱ्याची दुरुस्ती केली. खारलांड विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीने देखील दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात स्वतः चा जीव वाचवण्याची जबाबदारी स्वतः च उचलत बंधाऱ्याची दुरुस्ती केली.
वरवडे येथील खारलेंड विभागकडून बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्या वरील उघाडी ( गेट) अनेक वर्षे नादुरुस्त झाली आहे. पावसाळ्यात या गेट मधून पाणी थेट गावात शिरून अनेक घराना धोका निर्माण होतो. गतवर्षी देखील खाडीच पाणी थेट गावात शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले होते. अनेकांच्या नारळ आणि पोफळीच्या बागा पुर्णत नष्ट झाल्या. बंधाऱ्या वरील नादुरुस्त गेटची दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार इथल्या स्थानिक ग्रामस्थ आणि माजी सरपंच निखिल बोरकर यांच्या कडून करण्यात आली होती. स्थानिक ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अनेक वर्षे खरलेंड विभाग आणि ग्रामपंचायत यांच्याकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
बंधाऱ्याची तातडीने पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दुरुस्ती न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वखर्चाने आणि स्वतः कष्ट घेऊन बंधाऱ्याच्या गेटची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. वरवडे भंडार वाडी मधील ग्रामस्थ श्री. संतोष पाटील यांनी स्वतःच्या खर्चाने यासह भूषण पाटील, शिरीष बोरकर, बिपिन बोरकर, नीरज बोरकर यांनी अंग मेहनत करून या गेटची तात्पुरती दुरुस्ती करून घेतली. या कामात त्यांना माजी सरपंच निखिल बोरकर यांनी देखील सहकार्य केले. या गेट चे (उघाडीच) काम अद्यापही अपूर्ण आहे. कोणत्याही क्षणी बंधारा तुटून पाणी गावात घुसू शकते. या विभागाकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. सबंधित कामाची कायदेशीर चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे माजी सरपंच निखिल बोरकर यांनी सांगितले.