वरवडेत खासगी, पत्तनच्या जागेत नियमाचा भंग करून रस्ता

सीआरझेड नियमाचे उल्लंघन; काम थांबवण्याचे आदेश

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे-भंडारवाडा येथे खाडी व समुद्रकिनार्‍याजवळ खासगी व पत्तनविभागाच्या सार्वजनिक जागेमध्ये नियमांचा भंग करुन रस्ता तयार केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.  या कामात सीआरझेडचा उल्‍लंघन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर हे काम थांबवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत.

वरवडे गाव हा समुद्रकिनार्‍या लगत असून खाडीमुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. वरवडेतील भंडारवाडा येथे संरक्षणासाठी पत्तन विभागाने काँक्रीटचा बंधारा बांधलेला आहे. वरवडे खाडीपासून जवळचत खासगीजागा व सार्वजनिक स्मशानभूमी आहे. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतीतर्फे खासगी व सार्वजनिक जागेमधून खोदाई करुन रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शासनाच्या 25/15 या मुलभूत सुविधा कार्यक्रमांतर्गत हा रस्ता केला जात आहे. बंधार्‍याचे बाजूने रस्ता केला जात असल्याने पत्तन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे खासगी जमीन मालकांनाही याची कल्पना ग्रामपंचायतीने दिलेली नाही. त्यामुळे भंडारवाडा ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रस्त्याचे काम सुरु असताना ग्रामस्थांंनी अडवून बंद पाडले. जोरजबरदस्तीने विनापरवाना रस्ता करणार्‍यांवर कारवाई करावी यासाठी सुमारे ऐंशीपेक्षा अधिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पत्तन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांना निवेदन दिले आहे. या निवेदनानंतर बांधकाम विभागाच्या अधिकारी श्रीमती पुजारी यांनी काम थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. आपण स्वत: कामाची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.