वन नेशन, वन रेशनकार्डमुळे देशात कोठेही मिळणार धान्य

रत्नागिरी:- आता देशांतर्गत स्थलांतर झाल्यास आणि लाभार्थी असल्यास कोणत्याही रेशन दुकानात धान्य मिळणार आहे. केंद्र सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड ही योजना सुरू केले आहे. अनेकजण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्तलांतरित होतात. शासनाने वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजाणणीअंतर्गत हा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मेरा रेशन या ॲपची मार्च २०२१ मध्ये निर्मिती केली आहे. 

मेरा रेशन या ॲपद्वारे धान्याबरोबर नव्या रेशनकार्डसाठीही ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीशी निगडीत सर्व कामे या अॅपवरून ऑनलाईन करता येणार आहेत. रेशन कार्डधारकांना शासनाच्या पीडीएस प्रणाली अंतर्गत धान्य सुविधा मिळते. मात्र, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिथे धान्य मिळताना अडचण येते. यासाठी केंद्र सरकारचे १५ मार्च २०२१ रोजी हे अॅप सुरू केले. याद्वारे रेशनकार्ड डाऊनलोडही करता येते. रेशनकार्डवर किती वितरण झाले आहे, रेशन दुकाने कुठे कुठे आहेत, याची माहिती या मेरा रेशन या ॲपवर मिळते. या योजनेचा अनेक नोकरदार, व्यावसायिकांना फायदा होणार आहे.

मेरा रेशन ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. त्यानंतर मोबाईलमध्ये रजिस्ट्रेशन करावे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केले असेल तर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून रेशनचा फायदा घेता येतो. एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी रेशन सुविधा मिळावी, यासाठी केंद्र सरकारने वन नेशन, वन रेशनकार्ड ही सुविधा दिली आहे. त्यासाठी मेरा रेशन हे अॅप सुरू केले आहे. हे ॲप नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे, असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.