रत्नागिरी:- वन्य प्राण्याच्या हलल्यात शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास देण्यात येणार्या मदत निधीत पाच लाखाची वाढ करण्यात आली आहे. याआधी 15 लाखाचे अर्थ सहाय्य अशा प्रकरणात देण्यात येत होते. यामध्ये वाढ करुन आता वीस लाखाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
वन्यप्राण्यांमुळे शेतकर्यांवर तसेच इतर व्यक्तींवर देखील जीव गमावण्याची वेळ येते. बर्याचदा अशा घटनांमध्ये कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे आधीच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य अगोदर देण्यात होते. परंतु, आता त्यामध्ये पाच लाख रुपयांची वाढ करून ही रक्कम वीस लाख रुपये करण्यात आली आहे. या देण्यात येणार्या 20 लाख रुपयांच्या अर्थसहाय्य यापैकी दहा लाख रुपये हे देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाच्या माध्यमातून व उरलेली रक्कम दहा लाख रुपये ही त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणार्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर यामध्ये व्यक्ती कायम अपंग झाल्यास पाच लाख तर गंभीर रित्या जखमी झाल्यास एक लाख पंचवीस हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार असून, खासगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा वीस हजार रुपये प्रति व्यक्ती इतकी राहणार आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणार्या 60 हजार रू. इतक्या रकमेत वाढ करून ती 70 हजार रू. इतकी करण्यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणार्या 10 हजार रू. इतक्या रकमेत वाढ करून 15 हजार रू. इतकी वाढ करण्यात आली आहे. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास देण्यात येणारी 12 हजार इतकी रक्कम वाढवून 15 हजार रू. करण्यात आली आहे. तसेच गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास देण्यात येणारी 4 हजार रू. ची रक्कम 5000 रू. इतकी करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी व त्यामुळे संबंधित कुटुंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.









