संगमेश्वर तालुक्यातील मावळत धनगरवाडी येथील घटना
संगमेश्वर:- तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील एक ६० वर्षीय वृद्ध वणवा विझवण्यासाठी गेले असता, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बबन ढकू फांडे (वय ६०, रा. मुर्शी, मावळत धनगरवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबन फांडे हे नेहमीप्रमाणे गवत काडी आणि सरपणासाठी भडकंवा येथील ‘झिल्याचे पाणी’ या जंगलमय भागात जात असत. शनिवारी (२१ मार्च) दुपारी २ वाजेच्या सुमारास या भागात भीषण वणवा लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जंगलातील ही आग विझवण्यासाठी ते एकटेच गेले होते.
बबन फांडे बराच वेळ घरी न परतल्याने त्यांची पत्नी आणि भावाने काळजीपोटी जंगलात जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना ‘झिल्याचे पाणी’ या ठिकाणी बबन फांडे हे भाजलेल्या अवस्थेत उताणे पडलेले आढळले. वणव्याच्या आगीत होरपळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
याप्रकरणी साखरपा दूरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यू (आकरन्स नं. ३०/२०२६) म्हणून नोंद करण्यात आली असून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ११/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









