वडापच्या धडकेत दीड वर्षाची चिमुरडी गंभीर

राजापूर:- तालुक्यातील कारवली येथे बुधवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शकुंतला किरण चव्हाण या कारवली येथे राहणाऱ्या महिलेची दीड वर्षाची मुलगी संस्कृती किरण चव्हाण (मूळ रा. महादेवनगर, इस्लामपूर वाळवा, सांगली) ही वडाप गाडीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवली येथे राहणाऱ्या शकुंतला चव्हाण या पाचल बाजार करून राहत असलेल्या ठिकाणी कारवली रस्त्यावर वडाप गाडीतून उतरत असताना आणि पैसे देत असताना त्यांची मुलगी संस्कृती चव्हाण रस्त्यावर उभी होती. त्याचवेळी वडाप गाडी चालकाने अचानक गाडी मागे घेतली. त्यामुळे संस्कृती खाली पडली आणि गाडीचे एक चाक तिच्या पोटावरून गेले. अपघात घडताच शकुंतला चव्हाण व त्यांच्या नातेवाईकांनी मुलीला तातडीने कारवली-पाचल ग्रामीण रुग्णालयात नेले.

मात्र अधिक उपचारासाठी तिला १०८ ॲम्बुलन्सच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. राजापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.