लांजा:- लांजा बाजारपेठेत परजिल्ह्यातील व्यापारी वजनमाप करण्यासाठी चक्क दगडांचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दगडांचा वापर करून मापात पाप करत ग्राहकांना फसवले जात होते मात्र चाणाक्ष ग्राहकामुळे व्यापाऱ्यांचा हा प्रयत्न फसला असून अशा पद्धतीने व्यापार करणाऱ्या 19 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
लांजा तालुक्याचा मंगळवारी आठवडा बाजार असतो. या बाजाराला रत्नागिरीसह परजिल्ह्यातील व्यापारी व भाजी विक्रेते मोठ्या संख्येने येत असतात. दरम्यान मंगळवारी झालेल्या आठवडा बाजाराच्या दिवशी गंभीर बाब उघडकीस आली आहे. भाजी विक्रेते वजनकाटा व वजन मापाच्या ऐवजी दगड वापरत असल्याचे येथील चाणाक्ष तरुणांनी पाहिले. ते स्वतः ग्राहक बनून गेले. वजनकाटा करताना व्यापारी दगड टाकतो ही बाब लांजा नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील यांनी यामध्ये स्वतः लक्ष घातले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विजय गुंडये, संजय गुरव आदी बाजारात गेले. तेथे त्यांनी शोधमोहीम सुरू केली. यावेळी भाजी व्यापाऱ्यांच्या सर्वच वजन काट्यांची तपासणी केली. तपासणीत ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे पुन्हा निदर्शनास आले. स्टँम्पिंग वजनकाटा व वजन मापाच्या ऐवजी दगड वापरत असल्याची आढळून आले. त्यांनी लगेचच या 19 भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 3 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.
परजिल्ह्यातील हे भाजी विक्रेते स्टँम्पिंग न केलेले वजनकाटे व वजन मापाच्या ऐवजी दगडाचा वापर केल्याच्या घटना यापूर्वीही अनेकवेळा घडल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अशा भाजी विक्रेत्यांवर त्यावेळी लांजा नगरपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र अद्यापही त्यांच्यात बदल झालेला नाही.