लोटे येथील 75 एकर जागेवरील कोकोकोला कंपनी उभारण्याचा मार्ग मोकळा: ना. सामंत

रत्नागिरी:- लोटे (खेड) येथील 75 एकर जागेवर कोकोकोला कंपनीचा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले असून कंपनीसोबत स्थानिकांना रोजगारासमवेत वाहतुकीसंबंधीची कामे देण्याबाबतचा करार निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच 500 कोटी रू.ची गुंतवणूक असलेला प्रकल्प लोटे येथे उभा राहील. तर बारसू-सोलगाव प्रस्तावित ग्रीन रिफायनरीबाबत स्थानिकांच्या असलेल्या शंका दूर करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांवर देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली. तर वाटद येथील एमआयडीसीने संपादीत केलेल्या जागेचे डी-नोटीफिकेशन काढण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरील पेन्सिलीने केलेल्या नोंदी काढल्या जातील. जर शेतकऱ्यांना स्वतःहून प्रकल्पासाठी जागा द्यायची असेल तरच आता तेथील जागेचा विचार जागेचा विचार केला जाईल असे स्पष्टीकरण ना.सामंत यांनी दिले.

जिल्ह्यातील विकास-कामांचा आढावा घेतल्यानंतर ना.सामंत यांनी प्रकल्प, भूसंपादनाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. लोटे एमआयडीसी येथे कोकोकोला कंपनीच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. त्यांच्या काही समस्या होत्या त्यांचे निराकरण करण्यात आल्याने प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 75 एकर जागा कंपनीला देण्यात आली असून 25 एकरावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प उभा राहील असा विश्वास ना.सामंत यांनी व्यक्त केला.

बारसू येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. ज्या मुद्द्यांवर स्थानिक शेतकरी विरोध करत आहेत त्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करतील. तर जागेची चाचणी झाल्यानंतर आलेल्या अहवालावर प्रकल्प उभारण्याबाबतचा निर्णय होणार असल्याचेही ना.सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे मँगोपार्क, दापोली तालुक्यातील हर्णै येथे मरीनपार्क उभारण्यात येणार आहे. तर मंडणगड तालुक्यात जागा उपलब्ध झाल्यास एमआयडीसी उभारण्यात येणार आहे, असे ना.सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी विमानतळा-जवळील 27 एकर जागा विमान प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. रडार यंत्रणेसाठी आवश्यक जागा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले. s