चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा या रासायनिक कंपनीत आज दुपारी भीषण आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात दूरवर पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक लासा कंपनीच्या एका युनिटमध्ये आग भडकली. वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरली आणि बघता बघता संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कंपनीत ज्वलनशील रसायने असल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपन्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परिसरातील नागरिक सातत्याने सुरक्षा मानकांचे योग्य पालन करण्याची मागणी करत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत ही कंपनी असल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे.