रत्नागिरी:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल कंपनीत घातक रसायन पडून कामगाराचा भाजून मृत्यू झाला. राजकुमार मुल्ला असे त्याचे नाव आहे. तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत घरडा कंपनीत १६ तारखेला दुपारच्या वेळी कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार घातक रसायनाच्या संपर्क होऊन अत्यवस्थ झाला.
या प्रकरणी प्रवीण दत्ताराम काते (रा. घाणेखंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी लोटे पोलिस दूरक्षेत्र येथे माहिती दिली. त्या माहितीनुसार, राजकुमार मुल्ला (३०) हा घरडा केमिकल कंपनीत ठेकेदार पद्धतीने कामाला होता. गुरूवार (१६) रोजी दुपारच्या वेळी रसायन भरलेले ड्रम भरण्याचे काम करत असताना एका ड्रममधील घातक रसायन त्याच्या अंगावर पडल्याने तो भाजला. त्याला प्राथमिक उपचारासाठी घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने अधिक उपचारार्थ त्याला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.