खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सल फाटा ते पिरलोटेनजीक अज्ञात अवजड वाहन डोक्यावरून गेल्याने राकेश रमेश माने (२७, रा. गुणदे-तलारीवाडी) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात अवजड वाहनचालकाने तातडीने अपघातस्थळावरून पलायन केल्याने या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश माने हा दुचाकीने (एम.एच.०८-ए.एक्स.- २८८४) एक्सल फाटा बाजून पिरलोटेनजीक जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिली. यावेळी दुचाकीसह रस्त्यावर पडल्यानंतर अवजड वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने तातडीने पोबारा केला. अपघाताची माहिती मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय भोसले व सहकारी घटनास्थळी पोहचले. फरारी चालकाचा शोध सुरू आहे.