रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून गेले १५ दिवस प्रचाराचा धडाका सुरू होता. दिनांक ७ मे रोजी होणार्या मतदानासाठी प्रचाराची मुदत आज सायंकाळी ५ वाजता संपणार असून प्रचाराच्या तोफा पूर्णतः थंडावणार आहेत. उमेदवारांना केवळ घराघरात प्रचार करता येणार आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. आता प्रमुख नेते तिसर्या फेरीतील अन्य मतदारसंघात प्रचारासाठी दाखल होणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीमार्फत केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे तर महाविकास आघाडीमार्फत विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात आहेत. तर कोकण प्रादेशिक पक्षाचे अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्यासह अन्य सहाजण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, यांच्यामध्ये लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीमार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री.उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह स्वतः उमेदवार असलेले खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला होता. खा.राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित उद्धव ठाकरेंच्या सभेला रत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी श्री.ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
महायुतीमार्फत कद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, माजी आमदार बाळासाहेब माने, प्रमोद जठार यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला होता.
आज दि.५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा पूर्णतः थंडावणार आहेत. जाहीर प्रचाराला बंदी असल्याने उमेदवारांना घराघरात जाऊन प्रचार करावा लागणार आहे. तर दुसर्या बाजुला जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहेत. मतदानासाठी जिल्ह्याबाहेरी पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना बोलवण्यात आले असून ते आज जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तर उद्या दि.६ मे रोजी मतदान केंद्रप्रमुख मतदान केंद्राचा ताबा घेणार आहेत. दि.७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. यंदा प्रथमच मतदान प्रक्रियेसाठी सलग ११ तासांचा कालावधी देण्यात आला आहे.









