ना. उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी:- लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृती शताब्दी, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राच्या प्रकाशनासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत चरित्र साधने समितीची स्थापन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषेदेत केली. गुरुवारी त्यांनी झूम अँपद्वारे जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकमान्यांचा जन्म रत्नागिरीत झाला आहे. येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी लोकमान्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीसंदर्भात स्वराज्य ते सुराज्य संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यभर करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे हा 1 ऑगस्ट रोजी सर्व पक्षिय कार्यक्रम होत असून, राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, दीपक टिळक यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. यानिमित्ताने लोकमान्य टिळकांवर प्रा. राजा दिक्षित व अण्णाभाऊ साठे यांच्यावर सचिन साठे हे व्याख्यान करणार आहेत.
रत्नागिरीतील टिळक स्मारकाची दुरावस्था झाल्याचे ना. सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या वास्तूसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी तर टिळक मेमोरीयलच्या दुरुस्तीसाठी दोन कोटीचा निधी मागितला असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. हा कार्यक्रम सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना लिंक पाठवली जाणार आहे. फेसबूक लाईव्ह कार्यक्रम होणार असल्याने हजारो विद्यार्थी यात सहभागी होतील असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.









