रत्नागिरी:- राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मूळे व्यापारी वर्गात असंतोष पसरला आहे. लॉकडाऊनचे धोरण निश्चित करताना व्यापारी वर्गावर प्रचंड अन्याय करण्यात आला आहे. रस्त्यावर गर्दी आणि दुकान बंद असा अजब निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमधून सावरणाऱ्या व्यवसायाला पुन्हा जाहीर झालेल्या लॉकडाऊनने मारले आहे. या विरोधात व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला असून बुधवारी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर फलक हातात घेऊन आंदोलन केले.
कोरोनाने जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षभर व्यापारी अडचणीत होते. आता कुठे आर्थिक परिस्थिती मधून थोडेफार बाहेर येत असताना पुन्हा लॉक डाऊन झाल्याने व्यापारी हादरला आहे. शासनाने या लॉकडाऊनबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. आज व्यापारी वर्गाची परिस्थिती वाईट आहे. एकिकडे लॉकडाऊन दुसरीकडे कर्जाचे ओझे त्यामुळे व्यापाऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. रत्नागिरीत व्यापारी महासंघाकडून अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याला आवश्यक त्या पद्धतीने मदतीचा हात देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शासनाने व्यापाऱ्याचा अंत पाहू नये. अन्यथा व्यापारी वर्गाला उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
बाजारात अनेक दिवस मंदीच आहे. त्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन झाल्याने व्यापारी संकटात सापडला आहे. व्यापारी वर्गाकडून नियमाला धरून आंदोलने केली जाणार आहेत. त्यामध्ये भीक मागो आंदोलन, निषेध फलक तसेच आमचा बंद ला ठाम विरोध असल्याचे पत्रक दुकानाबाहेर लावणे, निवेदने देणे अशी लोकशाही मार्गाने आंदोलने केली जाणार आहेत. शहरात मंगळवार पासून मध्यवर्ती भागात बंद ला विरोधचे फलक महासंघाकडून लावले गेले आहेत. कोरोना आजाराबाबतची सर्व खबरदारी व्यापारी घेत आहेत आणि सरकारचे नियम पाळून व्यापार करणार असल्याने सरकार आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या लॉकडाऊन नंतर व्यापारी वर्गाला काही सवलती सरकार देईल असे वाटले होते. मात्र व्यापारी वर्गाच्या पदरात काहीच पडलेले नाही. हे सुद्धा महत्वाचे असल्याने आता पुन्हा ती वेळ सरकारने आणू नये आणि लॉकडाऊन रद्द करावा अशी व्यापारी वर्गाची मागणी आहे.