लॉकडाऊनमध्ये काम नाही; रत्नागिरीतील या गावातील ग्रामस्थांनी खणली विहीर

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या काळात रिकाम बसण्यापेक्षा अनेकांनी ना ना प्रयोग करून पाहिलेत. कुणी रोज नवनवीन पदार्थ बनवले, कुणी केक तयार केले, कुणी नवे व्हिडीओ बनवले मात्र रत्नागिरीतल्या या गावात चक्क 40 फूट खोल विहीर खणली. रत्नागिरी तालुक्यातील वेळवंडमधल्या भायजेवाडीतील ग्रामस्थांनी हा पराक्रम केला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत तब्बल 40 फूट खोल विहीर खोदली आहे. सध्या या विहिरीला मुबलक पाणी आहे.

सध्या या लॉकडाऊन विहिरीची सर्वत्र चर्चा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाला आणि अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. हातावर पोट असणारेही घरीच राहू लागले. त्यामुळे घरात नेमकं करायचं काय असा प्रश्न अनेकांसमोर होता. पण वेळ जात नव्हता म्हणून अनेकांनी वेगवेगळे  टाईमपास करणारे खेळ सुरू केले. मात्र काही ग्रामस्थ असेही आहेत की, ज्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत चक्क ‘लॉकडाऊन’ नावाची विहीर खोदून लॉकडाऊनच चिरंतन करून ठेवले. 

ही गोष्ट आहे रत्नागिरी तालुक्यातील वेळवंडमधल्या भायजेवाडीतील ग्रामस्थांची. लॉकडाऊन जाहीर झाला., पण वेळ जात नव्हता म्हणून अनेकांनी वेगवेगळे  टाईमपास करणारे खेळ सुरू केले, मात्र त्याला अपवाद ठरले ते भायजेवाडीतील 10 घरांची भायजे भावकी. वाढती कुटुंब संख्या त्यात दिवसेंदिवस पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेऊन त्यांनी विहीर खोदण्याचा फक्त निर्णयच घेतला नाही, तर प्रत्यक्ष तीन महिन्यांच्या कालावधीत 40 फूट विहीर खोदत एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि लॉकडाऊनच्या दुःखद आठवणींना ही सुखद करत कायमच स्मरणात राहिल असं काम केलं.
       

महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. दगडातून पाणी काढणे म्हणजे रक्ताचे पाणी करण्यासारखे आहे. तरुण मुलांना विहीर खोदण्याचा अनुभव नव्हता.काही तरुण मुंबईतून आलेले तर काही रंगकाम,बांधकाम करणारे होते पण जुन्याजाणत्या लोकांच्या मार्गदर्शनखाली सतत तीन महिने मेहनत व चिकाटीच्या जोरावर विहीर खोदली. सध्या या विहिरीला पाणीही मुबलक आहे.
   

ही विहीर खोदण्याच्या कामात  महिलांचाही वाटा खूप मोठा असल्याचे ग्रामस्थ तुकाराम भायजे यांनी सांगितले. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन व सहकार्य यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जि प सदस्य परशुराम कदम व पंचायत समिती सदस्य सौ साक्षी रावणंग,सरपंच संतोष गुरव,उपसरपंच मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत या विहिरीचे पूजन करण्यात आले आणि या विहिरीला ‘लॉकडाऊन विहीर’ असे नाव देण्यात आले. 
   

 विहीर खोदून झाली पण विहिरीतील पाणी घरापर्यंत पोचवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पण एकूणच लॉकडाऊनमधला वेळ सत्कारणी लावत या ग्रामस्थांनी जे काम केलं आहे ते नक्कीच आदर्शवत असंच आहे.