रत्नागिरी:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने रात्रीच्यावेळी केलेली संचारबंदी आणि आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवारी कडकडीत बंदचा फटका हॉटेल, लॉजिंग व्यवसायाला बसणार आहे. वर्षभरातील निर्बंधातून सावरण्यासाठी लाखो रुपयांची कर्ज काढत थांबलेला गाढा त्यांनी पुन्हा सुरु केला आहे; मात्र शासनाने घेतलेला हा निर्णय या व्यावसायिकांसाठी शंभर टक्के लॉकडाऊनप्रमाणेच ठरणार आहे.
कोरोनातील स्थिती विदारक झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच इतर सर्व दिवशी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाईचा इशारा दिला आहे. रत्नागिरीसारख्या शहरांमध्ये बहूतांश नागरिक दिवसभर काम करुन घरी परतल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणाचा प्लॅन आखतात. सर्वसाधारणपणे 8 वाजण्याच्या दरम्यान जेवणासाठी बाहेर पडतात. याच कालावधीत संचारबंदी लागू झाल्याने त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायावर होऊ शकतो. ‘टेक अवे’ सेवेचा फायदा घेणारा वर्ग रत्नागिरीत मोजकाच आहे. सध्या लॉकडाऊनच्या भितीने अनेक पर्यटकांनी निवासाची केलेली आरक्षणं रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. कोरोनापेक्षाही अचानक लागणार्या टाळेबंदीची भिती पर्यटकांमध्ये आहे. मागील वर्षीच्या टाळेबंदीमुळे बसलेला आर्थिक फटका सहन करत व्यावसायिकांनी नव्याने उभारण्यासाठी पावले उचलली होती. काहींनी कर्ज काढून व्यावसाय सुरु केला. अवघ्या तिन ते चार महिन्यात पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाचे सर्व नियम हे व्यावसायीक काटेकोरपणे पालन करत असताना ही वेळ आल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. शासनाने विकेंड लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय पर्यटन व्यावयायाचे कंबरडे मोडणारा ठरु शकतो. याच कालावधीत जिल्ह्यात पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. त्याचवेळी शंभर टक्के लॉकडाऊन होत असल्याने मिळणारा व्यावसायही जाऊ शकतो. व्यावसायिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी शासनाकडून मदत मिळणे आवश्यक असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.









