मुंबईः महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे. या नियमावलीनुसार, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय.
महाराष्ट्रातील ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार नागरिक विनाकारण जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकणार नाहीत. फक्त अत्यावशक काम आणि वैद्यकीय कामासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मुंबईतील लोकलमध्ये फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे.
महाराष्ट्रात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून खासगी वाहतुकीसाठी आता फक्त वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना प्रवास करता येणार आहे तसेच गाडीच्या आसन क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी गाडीमधून प्रवास करू शकणार आहेत. याबरोबरच जिल्हाबंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.
लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार लग्न कार्यक्रम आणि लग्नाचे सर्व विधी हे फक्त 2 तासांमध्ये आटोपून घ्यायचे आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास 50 हजार रुपयांचा दंड राज्य सरकारकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही नवीन आदेशात म्हटलं आहे.
नियमावलीत नेमके नियम कोणते?
●लग्न समारंभासाठी 25 जणांची उपस्थिती असून, दोन तासांत लग्नविधी करावे लागणार, नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड
●आंतरजिल्हा प्रवासही अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्या कामांसाठी असेल
●जिल्हा बंदी लागू करण्यात आली असून, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही
●मुंबईत खासगी गाडीतून 50 टक्के प्रवासाला परवानगी
●सरकारी कार्यालये 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील
●बसमध्ये उभ्यानं प्रवास करता येणार नाही, तसेच खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
●खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी असेल
●लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी पूर्णतः बंद असतील, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आयडी कार्ड सक्तीचे