रत्नागिरी:- महाराष्ट्रातील महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ ला रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४४० महिलांनी नोंदणी केली आहे. मात्र, या प्रचंड प्रतिसादासोबतच एक चिंताजनक बाबही समोर आली आहे. जिल्ह्यात पन्नास हजारांहून अधिक अर्ज रद्द झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात एकूण नोंदणी केलेल्या महिलांपैकी तब्बल ५०,७९८ अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. अर्ज रद्द होण्यामागे मुख्य कारणे म्हणजे, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी करणे, तसेच २० वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिलांनी अर्ज करणे. या मोठ्या संख्येमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी रत्नागिरी तालुक्यात झाली आहे, जिथे ५४,१३७ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यानंतर चिपळूण तालुक्यात ४३,८३१ आणि संगमेश्वर तालुक्यात ३२,५६८ महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर दिसून आला असून, २,७४,४५३ महिलांनी मोबाइल ॲपद्वारे, तर १,४९,९८७ महिलांनी पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज रद्द झाल्यामुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, रद्द झालेल्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून पात्र महिलांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.