लाचखोर मंडळ अधिकार्‍याकडे कोट्यावधींची मालमत्ता

खेडशीत अलिशान बंगला; शुक्रवारी जामिनावर सुटका

रत्नागिरी:- खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उतार्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्यासाठी ३१ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या खेडशी मंडळ अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र चिपरिकर यांने सेवेच्या अल्प कालावधित कोट्यावधींची मालमत्ता गोळा केल्याचे पुढे येत आहे. खेडशी येथेच कोट्यावधींचा बंगला त्याने नुकताच उभा केल्याचे पुढे आले असून त्याच्या मालमत्तेची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरु केली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अमित चिपरीकर (वय ३९) याने तक्रारदार यांच्या पक्षकाराने खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उतार्‍यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्याकरिता ४५ हजार रु.ची मागणी केली होती. त्यानंतर तोडजोडीअंती ३१ हजार रु. घेण्याचे त्याने मान्य केले होते. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर अमित चिपरिकर याला ३१ हजार रु.ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
शुक्रवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली असून आठवड्यातून दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.
वय वर्ष ३९ असलेल्या अमित चिपरिकर याने आपल्या अल्प सेवेच्या कालावधित कोट्यावधींची मालमत्ता गोळा केल्याचे पुढे आले आहे.खेडशी गावातच त्याने कोट्यावधींचा अलिशान बंगला उभारला आहे. त्याचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. अलिशान बंगला उभारण्यासाठी त्याने पैसे कुठून आणले हे लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे. तर त्याच्या बॅंक खात्याचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अमित चिपरिकर याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.