लांजा, रत्नागिरी तालुक्यात लंपी बाधित 24 जनावरे

रत्नागिरी:- जिल्ह्यात लम्पी त्वचा आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. लांजा आणि रत्नागिरी या दोन तालुक्यात मिळून 24 जनावरे लम्पीबाधित आढळली आहेत. त्यातील दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जि. प. चा पशुधन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. लसीकरणावर भर दिला जात असून, लागण झालेल्या जनावरांवर त्वरित उपचार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

तीन महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर तातडीने पशू विभागाकडून जनावरांना लस देण्यात आली होती. मागील वेळी 78 जनावरांना लागण झाली होती. गेल्या काही दिवसात पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. दोनच तालुक्यामध्ये या आजाराची लागण झालेली जनावरे आढळली आहेत. रत्नागिरीत 16 जनावरे आढळली असून, एक मृत पावले तर लांजा तालुक्यात 8 जनावरे सापडली असून 1 मृत पावले आहे. जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार, पशुपालकांकडे एकूण 2 लाख 35 हजार पशुधन आहे. त्यांना आवश्यक तेवढीच लस जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. पशुंसाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 14 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये बैल 56 हजार 599, गाय 48 हजार 637 आणि वासरे 9 हजार 380 आहेत. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. बाधित जनावरांना तत्काळ वेगळे करावे, गोठ्यात फवारणी करावी; डास, माशा, गोचीड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.