लांजा येथे शेळ्या चरवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

लांजा:- तालुक्यातील आसगे येथे रानात शेळ्या चरवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याने यामध्ये प्रकाश दत्ताराम मांडवकर (राहणार आसगे) हे जखमी झाले आहेत.

ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली असून प्रकाश दत्ताराम मांडवकर हे रानामध्ये शेळ्या चरवण्यासाठी गेलेले असताना पाठीमागून वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या उजव्या बाजूच्या पाठीवर बिबट्याने झडप घातली व पंजाने उजव्या बाजूचा भाग ओरबडून काढला आहे. यापूर्वी ही बिबट्याने अशाच पद्धतीने प्रकाश मांडवकर यांच्या शेळ्यांवर हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. आता तर चक्क माणसावरच हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकाश मांडवकर हे जखमी झाल्याने त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.