लांजा येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत पादचारी जागीच ठार

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील मुचकुंडी नदी पुलाजवळ १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एका भरधाव महिंद्रा एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचारी स्वप्निल गणपत बराम (वय ४०, रा. वाकेड, बरामवाडी, ता. लांजा) यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र श्रीराम रेवणे यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी या घटनेची फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अशोक पाटील (वय ३९, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) हा व्यक्ती आपली महिंद्रा एसयूव्ही ७०० (क्र. एम.एच.०४.एम.ई. २२००) ही मुंबई-गोवा रस्त्यावरून शहापूरहून गोव्याकडे घेऊन जात होता. गाडी भरधाव वेगात असताना लांजा येथील वाकेड-मुचकुंडी नदीच्या पुलाजवळ पोहोचला. रस्त्याच्या परिस्थितीची कोणतीही पर्वा न करता आरोपी पाटील याने आपले वाहन अत्यंत हयगयीने आणि अविचाराने चालवले. याच दरम्यान, गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला.

टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या पादचारी स्वप्निल गणपत बराम यांना तिने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की स्वप्निल बराम यांना गंभीर दुखापती झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गाडीचेही नुकसान झाले आहे.

या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गु.आर.क्र. २२७/२०२५, कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) (भारतीय दंड संहिता २०२३) आणि मो.व्हॅ.सी. कलम १८४ नुसार आदित्य अशोक पाटील या आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.