लांजा तालुक्यातील वाकेड गावी बिबट्याची दहशत; गोठ्यात घुसून तीन वासरांना ठार केले

लांजा:- वाकेड गुरववाडी येथील शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये घुसून वाघाने तीन वासरांचा ठार मारल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. वाघाच्या संचारामुळे वाकेड नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वाकेड गुरववाडी येथील मनोहर गुरव यांच्या मालकीच्या घरापासून शेतामध्ये असलेल्या गोठ्यामध्ये तीन गाई, एक पाडा व तीन वासरे गोठ्यामध्ये बांधण्यात आली होती. मंगळवारी रात्री वाघाने गोठ्यामध्ये घुसून तीन वासरावर हल्ला चढवला त्यामध्ये तीन्ही वासरे वाघाने ठार मारले. सकाळी आपली जणावरे चारण्यासाठी सोडण्यासाठी गेली असता त्यांना वाघाने गोठ्यात घुसून तीन वासरे मारल्याचे लक्षात आले. शेतकरी मनोहर गुरव यांनी लांजा वन विभागाला यांची माहिती दिली. त्यानुसार वनपाल सागर पताडे, वनरक्षक विक्रम कुंभार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. 

वाकेड येथे वाघाने जणावरे मारल्याने येथील नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या भातशेतीच्या कापणीचे काम सुरु असल्याने शेतामध्ये महिला एकट्या दुकट्या जाण्यास धजावत आहेत.